Tuesday, May 29, 2007

आन्दु ...
"योग्या, कधी आलास? बेंगलोर मधेच आहेस ना अजुन?" मी दिसलो रे दिसलो की आपल्या जोरदार आवाजात हाक मारणारा, सगळ्यांची चौकशी करणारा, मी न विचारता पण माझ्या अनुपस्थितित घडलेल्या सगळ्या ठळक बातम्या मला देणारा, स्वतःच्या बडबडीत वेळेचं भान विसरणारा आणि मग गडबडीत "आयला, आज पण उशिर झाला बघ. जाऊ का मी योग्या? घरी येऊन जा बरं का पेठेत आलास की. नक्की ये आणि. गंडवु नको मागच्या वेळेसारखा." असे म्हणुन माझा निरोप घेणारा माझा बालमित्र, आन्दु !!!

गजानन कुलकर्णी उर्फ गजा उर्फ आन्दु. ५ फुटाच्या आसपास उंची, १० नंबरचा जाड भिंगाचा चष्मा, भरघोस मिशा, केसांची फारशी गर्दी नसलेलं डोकं, न खोचलेला शर्ट, त्याखाली एखादी डगळी पॅंट असं काहिसं रुपडं असलेला हा इसम म्हंटलं तर माझा खुप जवळचा मित्र आहे म्हंटलं तर नाही सुद्धा. हे म्हणण्यामागं कारणंही तशीच आहेत.

५ वी मधे माझ्या वर्गात असल्यापासुन मी त्याला ओळखतो. आन्दु खुप लहान असताना त्याचे वडील वारले. घरची परिस्थिती तशी बेताचिच. मग आईने जेमतेम पगारात खुप कष्टाने त्याला लहानाचं मोठ्ठं केलं, शिकवलं. बी कॉम असुनही कुठे नोकरी मिळेना तेव्हा त्याला एकीकडे रिसेप्शनिस्ट म्हणुन चिकटवलं. पण हा पठ्या एका जागी स्थिर राहिल तर शप्पथ. आयुष्यात जितके चप्पलांचे जोड वापरले नसतील तितक्या नोकऱ्या बदलल्या याने एका वर्षात. मधे तर चक्क एका दवाखान्यात कंपाउंडर होता हा. बिचारा तो डॉक्टर आणि त्याहुन बिचारे त्याचे पेशंटस्. असो... नशिबाने गेले ६ महिने कुठल्याश्या एका पतसंस्थेत 'कर्जवसुली अधिकारी' या हुद्यावर टिकुन आहेत म्हणे साहेब अजुन. पगार इथेही कमीच मिळतोय त्याला पण "बी कॉम करुन एका बॅंकेत नोकरी करतोय सध्या" असे अभिमानाने सांगु तरी शकतो आज तो.

लहानपणी अभ्यास, कला, क्रिडा या सगळ्यात याचा नंबर नेहमी शेवटच्या दहांत लागायचा पण बोलण्यात मात्र एकदम चतुर होता हा. घरच्या परिस्थितिमुळं याला कधि चांगले कपडे, प्रत्येक विषयाला शिकवणी, सायकल, नवी पुस्तके,वह्या अशा सुविधा मिळाल्या नाहीत. पण आपल्या या परिस्थितिची त्याला काही जाणिव आहे, भविष्याची काही काळजी आहे असेही कधी जाणवलेच नाही आम्हाला. हो. खुप स्वाभिमानी होता मात्र तो. आईच्या नकळत त्याला मी मला लहान झालेले कपडे द्यायचो पण मी दिलेला एखादा शर्ट एकदाही मला त्याच्या अंगावर दिसला नाही. आजही मला वाटते की त्याला काही आर्थिक मदत करावी पण वाटते त्याला कदाचित ते आवडणार नाही. आणि तसंही, आहे त्याच्यात समाधानी आहे तो. किमान दाखवतो तरी तसंच.

आन्दु आता लग्नाचा झालाय पण अजुनही सगळे त्याला लहानच समजतात. त्याची टिंगलटवाळी करतात, त्याला हरबऱ्याच्या झाडावर चढवुन आपली बारीकसारीक कामं करुन घेतात. कदाचित आजही आजुबाजुला काय चाललंय याची तितकीशी जाणिव नाही आहे त्याला. कारण त्याचं सगळ्यांना खुश ठेवणे, बाकिची कामे बाजुला ठेवुन मित्रांच्या मदतीला जाणे, नेहमी दुसऱ्याच्या आनंदात आपली सगळी दुखं: लपवणे हे चालुच आहे. कुठल्याही गोष्टीची तक्रार नसते याची. खरंतर त्याच्यासाठी आपण फारसं काही करु शकलो नाही ही खंत माझ्या मनाला सारखी टोचत असतेच आजही. पण तरीसुद्धा तो जेव्हा भेटतो तेव्हा एका विचित्र पद्धतीने त्याला खांदे उडवत उडवत हसताना बघितलं की मात्र मनाला खुप खुप बरं वाटतं...

कालच फोन येऊन गेला त्याचा. "काय रे आन्दु? लग्न ठरलं की काय?" विचारल्यावर पुन्हा तसाच बालिशपणे हसला आणि म्हणाला, "ह्यॅ, हाहा तसं काही नाही रे बाबा हाहा... अरे नवीन मोबाईल घेतलाय मी. नंबर लिहुन घे. ९९७११२२२२०. बाकीच्यांना पण सांग. बाकी काय आणि योग्या? बेंगलोर मधेच आहेस ना अजुन? इकडं यायच्या आधि कॉल कर बरं का.. घरी येऊन जा आलास की. नक्की ये आणि. गंडवु नकोस मागच्या वेळेसारखा..."

3 comments:

कोहम said...

chaan lihilay...avadala

Meghana Bhuskute said...

मस्त लिहिलंय.

तुमचा आनंद said...

thodasa vyakti ani valli sarakha....
pan chotasa lihalay....

aawadala...