Thursday, May 10, 2007

कृष्ण जन्मला ग बाई...

माझे वेगळेपण अगदी माझ्या जन्मापासुनच कळुन येते. माझा जन्म गौरी विसर्जनाचा. रात्री १२ च्या सुमारास मी रडत रडतच या प्रुथ्वीवर पाऊल टाकले. (रात्र आणि माझी गट्टी ही तेव्हापासुनच.) मी आमच्या मिरजेच्या घरात एका अंधाऱ्या खोलीतच पहिले ट्यँहाँ केले अर्थात जन्मलो. काही थोर व्यक्तींमधे आणि माझ्यात येवढेच काय ते साम्य. आईला हॉस्पिटलात नेण्याइतपतही मी बाकीच्यांना वेळ दिला नाही. एखाद्या ठिकाणी दिलेल्या वेळेआधी पोचण्याची सवय ही तेव्हापासुनची बर का. घाई घाई मरणाची (खरे तर जन्माची) घाई मला. विशेष म्हणजे माझ्या पणजीनेच जिला आम्ही आज्जीया म्हणायचो तिनेच त्यावेळी डॉक्टरीण बाईची भुमिका पार पाडली.

गणपतीतला जन्म, मोठे कान आणि इतर बाळलीला पाहुन मला गणपतीचे एखादे नाव ठेवावे असे माझ्या आज्जीने सुचवले. आईच्याही मनात "प्रणव" नाव ठेवावे असे होतेच पण पत्रिकेप्रमाणे नेमके "यो" अक्षर आले आणि सगळा घोळ झाला. आजोबा माझे नाव योगेश्वर ठेवा म्हणत होते पण आई-बाबांनी त्याला जाम विरोध करुन शंभरातल्या किमान पंचवीस मुलांचे जे नाव असते तेच नाव माझेही ठेवले.. "योगेश" !!!

दुधाची तहान ताकावर या म्हणीप्रमाणे मला गणपतीचे नाही तर नाही किमान कृष्णाचे तरी असावे म्हणुन "योगेश" असे नाव ठेवण्यात आले...

No comments: