Sunday, May 13, 2007

झोप2
माझा झोप या विषयावरचा मागचा लेख वाचुन काही जणांनी असा समज करुन घेतला की ती माझीच सत्यकथा आहे पण खरे तर तसे काही नाही आहे. दोष तुमचाही नाही म्हणा. कमी झोप घेणारा, Night Shift करणारा प्राणी म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर मीच आलो असणार. उद्या जर मी AIDS वर लेख लिहीला तर तुम्ही मलाच AIDS झालाय अशी दवंडी पिटायला ही कमी करणार नाही. असो...

लहानपणी आपल्याला चालता चालता झोप घेणाऱ्या काकांची गोष्ट होती बालभारती च्या पुस्तकात. आठवतंय का? चालता चालता नाही पण उभ्या उभ्या झोप घेणारी खुप माणसे पाहिली आहेत मी मुंबई च्या Local मधे. खुप काम करुन खुप दमलेले असायचे हे लोक. डब्यात गर्दी कमी असेल तर मात्र त्यांची गैरसोय व्हायची. काम आणि झोपेच्या बाबतीत हेच लोक माझे आदर्श आहेत. कधी एकदा घरी जातो आणि झोपतो असे मलाही व्हायचे पण "अजुन किती दिवस आहेत पगाराला?", "उद्या पण ती जेवायला आपल्याच टेबलावर येऊन बसेल काय?", "काय थाप मारुन यावेळी घरी जायचे टाळायचे", "चित्रपट-नाटक यावर झालेला खर्च दुसऱ्या कोणत्या गोष्टीत भरुन काढायचा?", "उद्या ऑफ़िसला जाताना कुठले कपडे घालायचे" इत्यादी इत्यादी विचार करता करता पहाट झालेली असायची...

मला खरं तर डोळे मिटल्या मिटल्या घोरायला लागणाऱ्या माणसांचा खुप हेवा वाटतो. "जगी सर्वसुखी असा कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर सापडल्यासारखे वाटते यांना बघितले की. खरेही आहे म्हणा. या लोकांना कुठल्याही वेळी झोप येऊ शकते. सकाळी "morning walk" घेऊन आलं की, आंघोळ केली की, A/C मधे बसलं की, जेवण झालं की, रात्री बारीक प्रकाशात पुस्तक वाचु लागलं की किंवा अगदी theatre मधे Dolby sound मधेही यांना छान झोप लागते. माझ्या एका मित्राला तर आम्ही मिनी कुंभकर्ण म्हणायचो. झोपेत त्याला काही म्हणजे काही कळायचे नाही. आम्ही कधी त्याचा बेड हळूच उचलून टॉइलेट शेजारी नेऊन ठेवायचो तर कधी व्हरांड्यात त्याची "झोपूबाबा" म्हणुन प्रतिष्ठापना करायचो. मुलं चक्क दर्शनाला येऊन हळद-कुंकु वाहुन जायची. हा हळदीकुंकु कार्यक्रम काय असतो हे चावट लोकांच्या लगेच लक्षात येईल...

तुमच्यापैकी काही जणांनी मला नोकरी सोड, लग्न कर, झोप येत नाही या विचारालाच झोपव असे जे छान छान सल्ले दिलेत त्याचे मात्र मी तंतोतंत पालन करणार आहे. लवकरच मी भरपुर पगार असणाऱ्या मुलीशी लग्न करेन , मग ही नोकरी पण सोडुन देऊन घरी बसेन आणि बायकोला "झोप येत नाही या विचारालाच झोपवायचं अगं" असा सल्ला देऊन समजुत पण काढेन. तुम्हीही खुश आणि मीही...

झोपा आता !!!

No comments: