Tuesday, May 15, 2007

मी एक थिएटरवेडा...


खरं सांगायचं तर मला चित्रपट पाहण्याची जितकी आवड आहे त्यापेक्षाही चित्रपटगृह पाहण्याचीच जास्त आवड आहे. मला खुप कपॅसिटी असलेली, चांगली साउंडसिस्टिम असलेली, आत सुंदर इंटिरीअर असलेली, मोठ्ठी स्क्रिन असलेली आणि चित्रपटाचे खरे शौकीन प्रेक्षक जिथे येतात अशा थिएटर्सचे विशेष आकर्षण आहे.

माझ्या कराड मधे इतर गावांच्या मानाने तितकीशी चांगली थिएटर्स नाहीत, पण तरीही आज सुद्धा "रॉयल", "प्रभात" मधे मित्रांबरोबर दंगा करत चित्रपट पाहताना पूर्वीसारखीच मजा येते. "भैरवनाथ" मधे तर आम्ही खाली उंदीर फिरायचे म्हणुन चक्क खुर्चिवर मांडी घालून चित्रपट पाहिलेले आहेत. आता ४ पैकी "राजमहाल" बंद झालं, रॉयलचं तिकीट १० रु वरुन २० रु झालं, प्रभात डॉल्बी झालं, काय सांगावं लवकरच एखादं मल्टीप्लेक्स पण उभं राहील सांगली किंवा कोल्हापुर सारखं. चांगलंच आहे म्हणा. असो.

पुण्यातलं "मंगला" हे माझं ऑल टाईम फेवरिट थिएटर आहे. मध्यवर्ती लोकेशन, ११७५ ची सॉलिड कपॅसिटी, जबरदस्त डॉल्बी डीटीएस साउंडसिस्टिम, एअरकुल्ड, ६० एमएम स्क्रीन, कुणाचेही डोके मधे न येणाऱ्या खुर्च्या, ६०/४० रु तिकीट, कॉलेज आणि फॅमिली असं मिक्स क्राउड, भरपुर पार्किंग स्पेस, स्वच्छ टॉइलेटस्, इंटरमिशन मधे मिळणारे चविष्ट सामोसे इत्यादी इत्यादी सुविधा असल्यावर मंगलाला पिक्चर बघायला कुणाला आवडणार नाही? मी तर तिथं एकदा मॉर्निँगला "देवदास", मॅटीनीला "नयी पडोसन" आणि रेग्युलरला "भुत" असे ३ पिक्चर सलग पाहिलेले आहेत (एकाच तिकिटावर नाही बरं का). माझ्या पहिल्या जॉबसाठी इंटरव्यु झालेल्या दिवशी पुढे ऑफर येणारच या कॉन्फिडन्समधे खुश होवुन मी काही मित्रांना गोळा करुन मंगलाला "डरना मना है" दाखवला होता. नशिबाने पुढं खरंच ऑफर मिळाली पण आणि...

विशेष उल्लेख करावीत अशी इतर काही थिएटर्स म्हणजे मुंबईतील न्यु एक्सेलसिअर (मोठ्ठी स्क्रीन), मेट्रो (१५०० ची कपॅसिटी), चित्रा (कधिही जावा तिकीट मिळणार), पुण्यातील ई-स्क्वेअर स्क्रीन ५ (झक्कास साउंड), लक्ष्मिनारायण, राहुल (दंगा क्राऊड), सांगलीतील त्रिमुर्ती, स्वरुप (अवाढव्य), कोल्हापुरातील ऊषा (स्वस्तात मस्त), बेळगावातील नर्तकी (उत्क्रुष्ठ सिटस्) आणि बेंगलोरमधील पीवीआर (११ स्क्रिनचे मल्टिप्लेक्स)...

थिएटर्सच्या अजुन काही आठवणी म्हणजे ४६५ व्या आठवड्यात पण हाऊसफुल्ल गर्दीत मराठा मंदीर, मुंबई मधे पाहीलेला "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे", पुन्हा रिलीज झालेल्या "शोले" चा मिनर्वा, मुंबई ला पाहिलेला प्रिमिअर शो, मी ३/४ वर्षांचा असताना सगळ्यात पुढच्या रांगेत बसुन रॉयलला बघितलेला "तेरी मेहेरबानीयां", राजस्थान ट्रीपमधे बिकानेर च्या एका सिनेमाग्रुहात दरवाज्याशेजारी प्लॅस्टिक खुर्च्यांवर बसुन बघितलेला "हम आपके है कौन?", असंख्य (रडणाऱ्या) महिलांच्या गर्दीत प्रभात, पुणे मधे बघितलेला "माहेरची साडी", एकुण ३ इतर प्रेक्षकांबरोबर आयनॉक्स, पुणे मधे बघितलेला "३ दिवारें", आयमॅक्स अँडलँब्स, वडाळ्याच्या १५००० वॅट साउंडसिस्टिम आणि २०० फुटी आयमॅक्स स्क्रिनवर बघितलेला "स्पायडरमॅन २" आणि इंजिनिअरींगला असताना परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा उत्साहाने जाऊन जिथे "ज्ञानात भर टाकणारे" पिक्चर बघितले ते वारणानगरचे ५ रु तिकिटवाले "बापू थिएटर" पण...

जास्त मागणं नाही पण एखाद्या थिएटर मालकाच्या मुलिशी लग्न करायची माझी मनोमन इच्छा आहे. बघा आपल्या ओळखिची कुणी असेल तर...

5 comments:

Meghana Bhuskute said...

"जास्त मागणं नाही पण एखाद्या थिएटर मालकाच्या मुलिशी लग्न करायची माझी मनोमन इच्छा आहे. बघा आपल्या ओळखिची कुणी असेल तर..."
क्या बात है! याच चालीवर मीपण म्हणत असते, की एखादा थिएटरवाला भेटला तर बरं होईल. काही नाही तरी निदान आयुष्यातली एक महत्वाची गरज भागण्याची तरी ग्यारेण्टी!!!
मस्त लिहिलंय. :)

MANOJ said...

Yogesh found your article very much. I am also from Karad. I cant type in Marathi because I use Mac OS and don't know in detail about the system.

Unknown said...

Khupach Chan. Mi pan karadla post graduation sathi hote. Royal la Dil Chahta Hai pahila hota ani etaki gardi ki doorkipper ek motha danduka gheun ubha hota. Ani tya gardit mazya don maitrinina tya dandukyacha prasad milala hoata.

Yogesh said...

punyacha Rahul band jhala re...

~ŶΘĞĔšĤ~ said...

धन्यवाद मेघना, मनोज, पल्लवी...