Saturday, May 12, 2007

झोप म्हणजे काय रे भाऊ ???



Normal माणसाची सरासरी झोप ८ तास असते असे मी कुठेतरी वाचले होते. माझी सरासरी झोप ५ तास सुद्धा नाही. याचा अर्थ असा नाही की मी Normal नाही पण एकंदरीत झोप ही इतर अनेक स्त्रिलींगी गोष्टींप्रमाणे माझ्यापासून लांब लांब पळणारी गोष्ट आहे येवढं मात्र नक्की.

माझ्या तरुणपणीच्या काही चुकांमुळे सध्या सध्या माझ्यावर कमी झोप घेण्याची वेळ आलेली आहे हेही तितकेच खरे. नाही नाही... तुम्ही काहीतरी भलताच विचार करुन तुमच्या सुपिक डोक्याला जास्त ताण देऊ नका. त्या चुका म्हणजे "माझे Engineer होणे" आणि मला हा असला "Night Shift वाला Job मिळणे" या आहेत बाकी काही नाही.

झोपेची Definition सांगते की "Sleep is a physical and mental resting state in which a person becomes relatively inactive and unaware of the environment", पण हेही माझ्या झोपेच्या बाबतीत लागू पडत नाही. मी झोपेत सुद्धा कधी inactive आणि unaware नसतो. पाहुण्यांमधे झोपेवरुन कधी गप्पा निघाल्या की माझी आई अजुनही कौतुकाने(?) सगळ्यांना सांगते की "आहो हे तर काहीच नाही. आमचा कार्टा तर चक्क Cricket खेळायचा झोपेत." माझे 'झोपेतले Cricket' पाहुनच कदाचित आई ने मला प्रत्यक्ष Cricket खेळताना पाहायचे धाडस कधी केले नाही. अर्थात तेव्हाच तिने 'OUT' म्हणुन किंवा "तुला Indian Cricket Team मधुन काढुन टाकलेले आहे" असे सांगुन माझी ही सवय घालवली असती तर मी झोपेत का होईना पण दुसरेही काही खेळ खेळलो असतो. पण मला अजुनही नक्की आठवतंय की मी झोपताना जसा स्वत:ला डोक्यापासुन पायापर्यंत पांघरुणात गुंडाळुन घेऊन झोपायचो, सकाळी ऊठताना पण मी त्याच अवस्थेत असायचो.. असो.. आई कशाला खोटे बोलेल???

सांगायचा मुद्दा हा की, मी जे काही ४/५ तास झोपतो त्यातही किमान ३/४ वेळा मला जाग येते. आणि तीही क्षुल्लक कारणांवरुन. जसे कुणी पंखा १ वरुन २ वर केला की, कुणी आत कोण झोपलाय हे दाराचा कर्रकर्र आवाज करत बघुन गेलं की, किंवा कुणी मला ओलांडुन जाताना पाय आणि डोके नक्की कुठल्या दिशेला आहे हे न समजल्याने माझ्या पोटावरुन जाताना कांदाफोडणी खेळुन गेले की वगैरे वगैरे.. प्राण्यांशी तुलना केल्यास माझ्याएवढी झोप घेणाऱ्यांमधे गाढवाचा नंबर लागतो. पण हा निव्वळ योगायोग असावा कारण रोज ८ तास तरी झोप घेणाऱ्या तुमच्यासारख्यांच्या जोडीला प्राण्यांमधुन माकडाचा नंबर लागतो... असो...

अच्छा जी माणसे झोपेत घोरतात ती खुप सुखी असतात असेही मी ऐकलय. पण मला वाटते की असे काही नसते आणि एक तर त्यांच्या नाकात काही तरी Problem असतो म्हणुन ते घोरतात किंवा त्यांना दुसऱ्या लोकांना त्रास द्यायला खुप आवडत असते म्हणुन ते घोरतात. तुमच्याबद्दल नाही हो, मी आपले 'in general' सांगतोय. "मी झोपेत घोरत नाही" असे मी कुणाला अभिमानाने सांगायला गेलो तर लगेच पलिकडुन "अरे, जे लोक दिवसभर खुप काम करुन दमलेले असतात तेच रात्री घोरतात... तुला ना काम ना धाम तु कशाला घोरशिल" असे तिरकस टोमणे ऐकावे लागतात.

असे नाही की मला कधी शांत, भरपुर झोप मिळालीच नाही. आयुष्याची २ महत्त्वाची वर्षे मी निव्वळ लोळून वाया घालवली आहेत. १० वी आणि १२ वी. शाळेत, क्लासमधे, कॉलेजमधे झोपुन झोपुन मी खुप दमायचो आणि त्यामुळे मला रात्री पण छान झोप यायची. संध्याकाळी नदीकाठच्या बागेतल्या पारावर बसुन 'पक्षी-निरीक्षण' करणे हाच काय तो विरंगुळा असायचा तेव्हा. गेले ते दिवस... पुस्तक वाचायला सुरु केले की मला हमखास झोप यायची. आणि यात माझा काही दोष नसुन असलाच तर तो रटाळ Syllabus छापणाऱ्या पाठ्यपुस्तक महामंडळाचा आहे असे माझे ठाम मत होते. मला हातात पुस्तक घेऊन बसलेले उर्फ झोपलेले पाहुन आई काहिही न बोलता सरळ दिवा बंद करुन जायची आणि अचानक अंधार झाल्याने जाग येऊन मग मला Embarrassment की काय म्हणतात तसले व्हायचे. बाबा म्हणायचे की "अरे झोप येत असेल तर गणिते सोडवत बस." आता त्यांना कोण सांगणार की मला ती 'क' गट 'ड' गट वाली गणिते सुटली असती तर मी बोर्डात येण्याची आशा सोडली असती का? "अभ्यास करुन कोण शिपाई झालाय" अशी समजुत करुन घेऊन १२वी नंतर निमुटपणे दुकानात गल्ल्यावर बसण्याचेच मी नक्की केले होते. पण झाले मात्र वेगळेच.. छ्या...

Hostel ला राहायला गेल्यावर तर झोपेनं माझ्याकडे पाठच फिरवली. गावगप्पा मारुन झाल्या की मग रात्री ३,४ ला झोपुन सकाळी निवांतपणे ऊठायचे आणि जमले तर ३ऱ्या, ४थ्या Lecture ला जायचे असा खास प्लॅन आमचा रूम पार्टनर ६ चा अलार्म, घसा/नाक साफ़ करणे कार्यक्रम, बादलीचे वाद्यसंगित आणि नंतर पूजेच्या वेळी घंटेची टिणटिण ईत्यादी प्रकार करुन ऊधळुन लावायचा. एक वेळ रात्री बरोब्बर माझ्याच कानाशी गुणगुण करणारे डास परवडले पण याच्या घंटेची टिणटिण नको असे व्हायचे कधिकधि पण तो नंतर Canteen ला गेलो की रोज आम्हाला चहा, पोहे, बटाटावडा खायला घालायचा त्यामुळे आम्हाला दया येऊन आम्ही त्याच्या त्या 'झोपमोडु' चाळ्यांकडे दुर्लक्ष करायचो.

मी काही दिवसांपुर्वी माझ्या कमी झोपेविषयी एका होवु घातलेल्या आणि लवकरच ज्याच्यामुळे कित्येक पेशंट्स चा जीव धोक्यात येणार आहे अशा माझ्या Doctor मित्राचा सल्ला घेण्याची चुक केली. मला नक्की काय होतंय हे पुर्ण न ऐकताच "साल्या, तुला ४ तास तरी झोप मिळतीय, मला साधी २ तास पण नाही मिळत या पेशंट्स मुळं" असे ऐकवुन माझ्या तोंडाला टाके घातले. नंतर "तु पण माझ्यासारखंच झोपेच्या गोळ्या घेणे चालु कर" असा एक जालिम उपायही सुचवलान त्यानं.. तो बोलता बोलता झोपल्यावर मी तिथुन तडक निघालो आणि पुन्हा कुठल्याही नव्या Doctor कडे पण गेलो नाही.
तसं पाहायला गेलं (शब्दश: नाही) तर इतरही काही दैनिक गोष्टी ठराविक वेळी माझ्याकडुन होत नाहीत, त्याकरीता बऱ्याच वेळा मला 'विशेष प्रयत्न' करावे लागतात. झोप ही पण आता त्यातलीच एक गोष्ट झालेली आहे. तात्पर्य हेच की "माझ्या झोपेची झोप सध्या पार उडालेली आहे..."

ठिक आहे तर मग मित्रांनो, मैत्रिणिंनो आता बास करतो हे 'झोप-पुराण'. सकाळचे १० वाजलेत आणि चक्क मला खुप झोप येतीय. तुम्हा सर्वांना यापुढेही उत्तम झोप मिळो, छान छान स्वप्ने पडोत हीच निद्रादेवतेच्या चरणी प्रार्थना. मलाही जरा झोप मिळो, कमी भयानक स्वप्ने पडोत, आणि लवकरच 'जवळजवळ' झोपण्याची संधी लाभो यासाठी तुम्हीही प्रार्थना करालच. Good Night... oops... Good Day...

(तेवढ्यात...)

टिंगटिडींग टि टिंगटिडींग टी टिंग टिंग टिंग ("मुझको निंद आ रही है सोने दो" च्या चालीवर) "Hello!!! yes sir... not really sir... Conference call at 12 ???... Ammmm... no problem sir...!!!"

घ्या... वाजले माझ्या झोपेचे १२ !!!

No comments: