Saturday, June 16, 2007

या घुबडांनो, परत फिरा रे

Original

या चिमण्यांनो, परत फिरा रे
घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर
चुकचूक करीते पाल उगाच, चिंता मज लागल्या

अवतीभवती असल्यावाचून कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा, आमुच्या कधीही कामाचा
या बाळांनो या रे लवकर, वाटा अंधारल्या

विडंबन
Manager che amha Night Shift karnarya "DBA"s varil prem paha...

या घुबडांनो, परत फिरा रे
Office कडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता, Issues ना पूर
अशा अवेळी असू नका रे Desk पासून दूर
चुकचूक करीतो Customer उगाच, चिंता मज लागल्या

अवतीभवती असल्यावाचून कोलाहल Team Leaders चा
उरक न होतो तुम्हा, तुमच्या कधीही कामाचा
या गुरख्यांनो या रे लवकर, वाटा अंधारल्या

Tuesday, May 29, 2007

आन्दु ...
"योग्या, कधी आलास? बेंगलोर मधेच आहेस ना अजुन?" मी दिसलो रे दिसलो की आपल्या जोरदार आवाजात हाक मारणारा, सगळ्यांची चौकशी करणारा, मी न विचारता पण माझ्या अनुपस्थितित घडलेल्या सगळ्या ठळक बातम्या मला देणारा, स्वतःच्या बडबडीत वेळेचं भान विसरणारा आणि मग गडबडीत "आयला, आज पण उशिर झाला बघ. जाऊ का मी योग्या? घरी येऊन जा बरं का पेठेत आलास की. नक्की ये आणि. गंडवु नको मागच्या वेळेसारखा." असे म्हणुन माझा निरोप घेणारा माझा बालमित्र, आन्दु !!!

गजानन कुलकर्णी उर्फ गजा उर्फ आन्दु. ५ फुटाच्या आसपास उंची, १० नंबरचा जाड भिंगाचा चष्मा, भरघोस मिशा, केसांची फारशी गर्दी नसलेलं डोकं, न खोचलेला शर्ट, त्याखाली एखादी डगळी पॅंट असं काहिसं रुपडं असलेला हा इसम म्हंटलं तर माझा खुप जवळचा मित्र आहे म्हंटलं तर नाही सुद्धा. हे म्हणण्यामागं कारणंही तशीच आहेत.

५ वी मधे माझ्या वर्गात असल्यापासुन मी त्याला ओळखतो. आन्दु खुप लहान असताना त्याचे वडील वारले. घरची परिस्थिती तशी बेताचिच. मग आईने जेमतेम पगारात खुप कष्टाने त्याला लहानाचं मोठ्ठं केलं, शिकवलं. बी कॉम असुनही कुठे नोकरी मिळेना तेव्हा त्याला एकीकडे रिसेप्शनिस्ट म्हणुन चिकटवलं. पण हा पठ्या एका जागी स्थिर राहिल तर शप्पथ. आयुष्यात जितके चप्पलांचे जोड वापरले नसतील तितक्या नोकऱ्या बदलल्या याने एका वर्षात. मधे तर चक्क एका दवाखान्यात कंपाउंडर होता हा. बिचारा तो डॉक्टर आणि त्याहुन बिचारे त्याचे पेशंटस्. असो... नशिबाने गेले ६ महिने कुठल्याश्या एका पतसंस्थेत 'कर्जवसुली अधिकारी' या हुद्यावर टिकुन आहेत म्हणे साहेब अजुन. पगार इथेही कमीच मिळतोय त्याला पण "बी कॉम करुन एका बॅंकेत नोकरी करतोय सध्या" असे अभिमानाने सांगु तरी शकतो आज तो.

लहानपणी अभ्यास, कला, क्रिडा या सगळ्यात याचा नंबर नेहमी शेवटच्या दहांत लागायचा पण बोलण्यात मात्र एकदम चतुर होता हा. घरच्या परिस्थितिमुळं याला कधि चांगले कपडे, प्रत्येक विषयाला शिकवणी, सायकल, नवी पुस्तके,वह्या अशा सुविधा मिळाल्या नाहीत. पण आपल्या या परिस्थितिची त्याला काही जाणिव आहे, भविष्याची काही काळजी आहे असेही कधी जाणवलेच नाही आम्हाला. हो. खुप स्वाभिमानी होता मात्र तो. आईच्या नकळत त्याला मी मला लहान झालेले कपडे द्यायचो पण मी दिलेला एखादा शर्ट एकदाही मला त्याच्या अंगावर दिसला नाही. आजही मला वाटते की त्याला काही आर्थिक मदत करावी पण वाटते त्याला कदाचित ते आवडणार नाही. आणि तसंही, आहे त्याच्यात समाधानी आहे तो. किमान दाखवतो तरी तसंच.

आन्दु आता लग्नाचा झालाय पण अजुनही सगळे त्याला लहानच समजतात. त्याची टिंगलटवाळी करतात, त्याला हरबऱ्याच्या झाडावर चढवुन आपली बारीकसारीक कामं करुन घेतात. कदाचित आजही आजुबाजुला काय चाललंय याची तितकीशी जाणिव नाही आहे त्याला. कारण त्याचं सगळ्यांना खुश ठेवणे, बाकिची कामे बाजुला ठेवुन मित्रांच्या मदतीला जाणे, नेहमी दुसऱ्याच्या आनंदात आपली सगळी दुखं: लपवणे हे चालुच आहे. कुठल्याही गोष्टीची तक्रार नसते याची. खरंतर त्याच्यासाठी आपण फारसं काही करु शकलो नाही ही खंत माझ्या मनाला सारखी टोचत असतेच आजही. पण तरीसुद्धा तो जेव्हा भेटतो तेव्हा एका विचित्र पद्धतीने त्याला खांदे उडवत उडवत हसताना बघितलं की मात्र मनाला खुप खुप बरं वाटतं...

कालच फोन येऊन गेला त्याचा. "काय रे आन्दु? लग्न ठरलं की काय?" विचारल्यावर पुन्हा तसाच बालिशपणे हसला आणि म्हणाला, "ह्यॅ, हाहा तसं काही नाही रे बाबा हाहा... अरे नवीन मोबाईल घेतलाय मी. नंबर लिहुन घे. ९९७११२२२२०. बाकीच्यांना पण सांग. बाकी काय आणि योग्या? बेंगलोर मधेच आहेस ना अजुन? इकडं यायच्या आधि कॉल कर बरं का.. घरी येऊन जा आलास की. नक्की ये आणि. गंडवु नकोस मागच्या वेळेसारखा..."

Monday, May 28, 2007

गारवा ... बेवड्यांचा !!!

Original

गीतकार : सौमित्र
Album : गारवा

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

विडंबन

ग्लासभर दारु खिडकीत उभं राहून ढोसुन पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, ग्लासमधे झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारा बियरचा फेस चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, गुत्त्यावर ये
तो भरलेला असेलच, टेबलावर हात ठेवुन बसुन रहा
खुर्ची सरकेल बुडाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग पिऊ लाग, दारुचे अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा संपेपर्यत, तो संपणार नाहिच, शेवटी घरी ये
चड्डी बदलू नकोस, ग्लास पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता बेवड्यांची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली बाटली घे, ओपनर तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या झिंगण्याचं कारण, तू म्हणं ज्युस संपलंय
मग चिअर्स कर, तूही घे
तो उठून हिमेश रेशमिया लावेल, तो तू बंद कर
किशोरचं शराबी लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला बिल देईल, म्हणेल तू मला देणं लागतोस
पण तुही तसचं म्हणं
मोबाईलचा थरथराट होईल, तो घराकडे रवाना होईल
तो त्या गटारात पडेल, त्याच्या माखलेल्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी रस्त्ता पहायला विसरू नकोस
यानंतर दारुड्यांचा आवाज नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली बाटली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या गटारीला एक क्षणतरी, बघ माझी आठवण येते का?

Tuesday, May 15, 2007

मी एक थिएटरवेडा...


खरं सांगायचं तर मला चित्रपट पाहण्याची जितकी आवड आहे त्यापेक्षाही चित्रपटगृह पाहण्याचीच जास्त आवड आहे. मला खुप कपॅसिटी असलेली, चांगली साउंडसिस्टिम असलेली, आत सुंदर इंटिरीअर असलेली, मोठ्ठी स्क्रिन असलेली आणि चित्रपटाचे खरे शौकीन प्रेक्षक जिथे येतात अशा थिएटर्सचे विशेष आकर्षण आहे.

माझ्या कराड मधे इतर गावांच्या मानाने तितकीशी चांगली थिएटर्स नाहीत, पण तरीही आज सुद्धा "रॉयल", "प्रभात" मधे मित्रांबरोबर दंगा करत चित्रपट पाहताना पूर्वीसारखीच मजा येते. "भैरवनाथ" मधे तर आम्ही खाली उंदीर फिरायचे म्हणुन चक्क खुर्चिवर मांडी घालून चित्रपट पाहिलेले आहेत. आता ४ पैकी "राजमहाल" बंद झालं, रॉयलचं तिकीट १० रु वरुन २० रु झालं, प्रभात डॉल्बी झालं, काय सांगावं लवकरच एखादं मल्टीप्लेक्स पण उभं राहील सांगली किंवा कोल्हापुर सारखं. चांगलंच आहे म्हणा. असो.

पुण्यातलं "मंगला" हे माझं ऑल टाईम फेवरिट थिएटर आहे. मध्यवर्ती लोकेशन, ११७५ ची सॉलिड कपॅसिटी, जबरदस्त डॉल्बी डीटीएस साउंडसिस्टिम, एअरकुल्ड, ६० एमएम स्क्रीन, कुणाचेही डोके मधे न येणाऱ्या खुर्च्या, ६०/४० रु तिकीट, कॉलेज आणि फॅमिली असं मिक्स क्राउड, भरपुर पार्किंग स्पेस, स्वच्छ टॉइलेटस्, इंटरमिशन मधे मिळणारे चविष्ट सामोसे इत्यादी इत्यादी सुविधा असल्यावर मंगलाला पिक्चर बघायला कुणाला आवडणार नाही? मी तर तिथं एकदा मॉर्निँगला "देवदास", मॅटीनीला "नयी पडोसन" आणि रेग्युलरला "भुत" असे ३ पिक्चर सलग पाहिलेले आहेत (एकाच तिकिटावर नाही बरं का). माझ्या पहिल्या जॉबसाठी इंटरव्यु झालेल्या दिवशी पुढे ऑफर येणारच या कॉन्फिडन्समधे खुश होवुन मी काही मित्रांना गोळा करुन मंगलाला "डरना मना है" दाखवला होता. नशिबाने पुढं खरंच ऑफर मिळाली पण आणि...

विशेष उल्लेख करावीत अशी इतर काही थिएटर्स म्हणजे मुंबईतील न्यु एक्सेलसिअर (मोठ्ठी स्क्रीन), मेट्रो (१५०० ची कपॅसिटी), चित्रा (कधिही जावा तिकीट मिळणार), पुण्यातील ई-स्क्वेअर स्क्रीन ५ (झक्कास साउंड), लक्ष्मिनारायण, राहुल (दंगा क्राऊड), सांगलीतील त्रिमुर्ती, स्वरुप (अवाढव्य), कोल्हापुरातील ऊषा (स्वस्तात मस्त), बेळगावातील नर्तकी (उत्क्रुष्ठ सिटस्) आणि बेंगलोरमधील पीवीआर (११ स्क्रिनचे मल्टिप्लेक्स)...

थिएटर्सच्या अजुन काही आठवणी म्हणजे ४६५ व्या आठवड्यात पण हाऊसफुल्ल गर्दीत मराठा मंदीर, मुंबई मधे पाहीलेला "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे", पुन्हा रिलीज झालेल्या "शोले" चा मिनर्वा, मुंबई ला पाहिलेला प्रिमिअर शो, मी ३/४ वर्षांचा असताना सगळ्यात पुढच्या रांगेत बसुन रॉयलला बघितलेला "तेरी मेहेरबानीयां", राजस्थान ट्रीपमधे बिकानेर च्या एका सिनेमाग्रुहात दरवाज्याशेजारी प्लॅस्टिक खुर्च्यांवर बसुन बघितलेला "हम आपके है कौन?", असंख्य (रडणाऱ्या) महिलांच्या गर्दीत प्रभात, पुणे मधे बघितलेला "माहेरची साडी", एकुण ३ इतर प्रेक्षकांबरोबर आयनॉक्स, पुणे मधे बघितलेला "३ दिवारें", आयमॅक्स अँडलँब्स, वडाळ्याच्या १५००० वॅट साउंडसिस्टिम आणि २०० फुटी आयमॅक्स स्क्रिनवर बघितलेला "स्पायडरमॅन २" आणि इंजिनिअरींगला असताना परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा उत्साहाने जाऊन जिथे "ज्ञानात भर टाकणारे" पिक्चर बघितले ते वारणानगरचे ५ रु तिकिटवाले "बापू थिएटर" पण...

जास्त मागणं नाही पण एखाद्या थिएटर मालकाच्या मुलिशी लग्न करायची माझी मनोमन इच्छा आहे. बघा आपल्या ओळखिची कुणी असेल तर...

Sunday, May 13, 2007

झोप2
माझा झोप या विषयावरचा मागचा लेख वाचुन काही जणांनी असा समज करुन घेतला की ती माझीच सत्यकथा आहे पण खरे तर तसे काही नाही आहे. दोष तुमचाही नाही म्हणा. कमी झोप घेणारा, Night Shift करणारा प्राणी म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर मीच आलो असणार. उद्या जर मी AIDS वर लेख लिहीला तर तुम्ही मलाच AIDS झालाय अशी दवंडी पिटायला ही कमी करणार नाही. असो...

लहानपणी आपल्याला चालता चालता झोप घेणाऱ्या काकांची गोष्ट होती बालभारती च्या पुस्तकात. आठवतंय का? चालता चालता नाही पण उभ्या उभ्या झोप घेणारी खुप माणसे पाहिली आहेत मी मुंबई च्या Local मधे. खुप काम करुन खुप दमलेले असायचे हे लोक. डब्यात गर्दी कमी असेल तर मात्र त्यांची गैरसोय व्हायची. काम आणि झोपेच्या बाबतीत हेच लोक माझे आदर्श आहेत. कधी एकदा घरी जातो आणि झोपतो असे मलाही व्हायचे पण "अजुन किती दिवस आहेत पगाराला?", "उद्या पण ती जेवायला आपल्याच टेबलावर येऊन बसेल काय?", "काय थाप मारुन यावेळी घरी जायचे टाळायचे", "चित्रपट-नाटक यावर झालेला खर्च दुसऱ्या कोणत्या गोष्टीत भरुन काढायचा?", "उद्या ऑफ़िसला जाताना कुठले कपडे घालायचे" इत्यादी इत्यादी विचार करता करता पहाट झालेली असायची...

मला खरं तर डोळे मिटल्या मिटल्या घोरायला लागणाऱ्या माणसांचा खुप हेवा वाटतो. "जगी सर्वसुखी असा कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर सापडल्यासारखे वाटते यांना बघितले की. खरेही आहे म्हणा. या लोकांना कुठल्याही वेळी झोप येऊ शकते. सकाळी "morning walk" घेऊन आलं की, आंघोळ केली की, A/C मधे बसलं की, जेवण झालं की, रात्री बारीक प्रकाशात पुस्तक वाचु लागलं की किंवा अगदी theatre मधे Dolby sound मधेही यांना छान झोप लागते. माझ्या एका मित्राला तर आम्ही मिनी कुंभकर्ण म्हणायचो. झोपेत त्याला काही म्हणजे काही कळायचे नाही. आम्ही कधी त्याचा बेड हळूच उचलून टॉइलेट शेजारी नेऊन ठेवायचो तर कधी व्हरांड्यात त्याची "झोपूबाबा" म्हणुन प्रतिष्ठापना करायचो. मुलं चक्क दर्शनाला येऊन हळद-कुंकु वाहुन जायची. हा हळदीकुंकु कार्यक्रम काय असतो हे चावट लोकांच्या लगेच लक्षात येईल...

तुमच्यापैकी काही जणांनी मला नोकरी सोड, लग्न कर, झोप येत नाही या विचारालाच झोपव असे जे छान छान सल्ले दिलेत त्याचे मात्र मी तंतोतंत पालन करणार आहे. लवकरच मी भरपुर पगार असणाऱ्या मुलीशी लग्न करेन , मग ही नोकरी पण सोडुन देऊन घरी बसेन आणि बायकोला "झोप येत नाही या विचारालाच झोपवायचं अगं" असा सल्ला देऊन समजुत पण काढेन. तुम्हीही खुश आणि मीही...

झोपा आता !!!

Saturday, May 12, 2007

झोप म्हणजे काय रे भाऊ ???Normal माणसाची सरासरी झोप ८ तास असते असे मी कुठेतरी वाचले होते. माझी सरासरी झोप ५ तास सुद्धा नाही. याचा अर्थ असा नाही की मी Normal नाही पण एकंदरीत झोप ही इतर अनेक स्त्रिलींगी गोष्टींप्रमाणे माझ्यापासून लांब लांब पळणारी गोष्ट आहे येवढं मात्र नक्की.

माझ्या तरुणपणीच्या काही चुकांमुळे सध्या सध्या माझ्यावर कमी झोप घेण्याची वेळ आलेली आहे हेही तितकेच खरे. नाही नाही... तुम्ही काहीतरी भलताच विचार करुन तुमच्या सुपिक डोक्याला जास्त ताण देऊ नका. त्या चुका म्हणजे "माझे Engineer होणे" आणि मला हा असला "Night Shift वाला Job मिळणे" या आहेत बाकी काही नाही.

झोपेची Definition सांगते की "Sleep is a physical and mental resting state in which a person becomes relatively inactive and unaware of the environment", पण हेही माझ्या झोपेच्या बाबतीत लागू पडत नाही. मी झोपेत सुद्धा कधी inactive आणि unaware नसतो. पाहुण्यांमधे झोपेवरुन कधी गप्पा निघाल्या की माझी आई अजुनही कौतुकाने(?) सगळ्यांना सांगते की "आहो हे तर काहीच नाही. आमचा कार्टा तर चक्क Cricket खेळायचा झोपेत." माझे 'झोपेतले Cricket' पाहुनच कदाचित आई ने मला प्रत्यक्ष Cricket खेळताना पाहायचे धाडस कधी केले नाही. अर्थात तेव्हाच तिने 'OUT' म्हणुन किंवा "तुला Indian Cricket Team मधुन काढुन टाकलेले आहे" असे सांगुन माझी ही सवय घालवली असती तर मी झोपेत का होईना पण दुसरेही काही खेळ खेळलो असतो. पण मला अजुनही नक्की आठवतंय की मी झोपताना जसा स्वत:ला डोक्यापासुन पायापर्यंत पांघरुणात गुंडाळुन घेऊन झोपायचो, सकाळी ऊठताना पण मी त्याच अवस्थेत असायचो.. असो.. आई कशाला खोटे बोलेल???

सांगायचा मुद्दा हा की, मी जे काही ४/५ तास झोपतो त्यातही किमान ३/४ वेळा मला जाग येते. आणि तीही क्षुल्लक कारणांवरुन. जसे कुणी पंखा १ वरुन २ वर केला की, कुणी आत कोण झोपलाय हे दाराचा कर्रकर्र आवाज करत बघुन गेलं की, किंवा कुणी मला ओलांडुन जाताना पाय आणि डोके नक्की कुठल्या दिशेला आहे हे न समजल्याने माझ्या पोटावरुन जाताना कांदाफोडणी खेळुन गेले की वगैरे वगैरे.. प्राण्यांशी तुलना केल्यास माझ्याएवढी झोप घेणाऱ्यांमधे गाढवाचा नंबर लागतो. पण हा निव्वळ योगायोग असावा कारण रोज ८ तास तरी झोप घेणाऱ्या तुमच्यासारख्यांच्या जोडीला प्राण्यांमधुन माकडाचा नंबर लागतो... असो...

अच्छा जी माणसे झोपेत घोरतात ती खुप सुखी असतात असेही मी ऐकलय. पण मला वाटते की असे काही नसते आणि एक तर त्यांच्या नाकात काही तरी Problem असतो म्हणुन ते घोरतात किंवा त्यांना दुसऱ्या लोकांना त्रास द्यायला खुप आवडत असते म्हणुन ते घोरतात. तुमच्याबद्दल नाही हो, मी आपले 'in general' सांगतोय. "मी झोपेत घोरत नाही" असे मी कुणाला अभिमानाने सांगायला गेलो तर लगेच पलिकडुन "अरे, जे लोक दिवसभर खुप काम करुन दमलेले असतात तेच रात्री घोरतात... तुला ना काम ना धाम तु कशाला घोरशिल" असे तिरकस टोमणे ऐकावे लागतात.

असे नाही की मला कधी शांत, भरपुर झोप मिळालीच नाही. आयुष्याची २ महत्त्वाची वर्षे मी निव्वळ लोळून वाया घालवली आहेत. १० वी आणि १२ वी. शाळेत, क्लासमधे, कॉलेजमधे झोपुन झोपुन मी खुप दमायचो आणि त्यामुळे मला रात्री पण छान झोप यायची. संध्याकाळी नदीकाठच्या बागेतल्या पारावर बसुन 'पक्षी-निरीक्षण' करणे हाच काय तो विरंगुळा असायचा तेव्हा. गेले ते दिवस... पुस्तक वाचायला सुरु केले की मला हमखास झोप यायची. आणि यात माझा काही दोष नसुन असलाच तर तो रटाळ Syllabus छापणाऱ्या पाठ्यपुस्तक महामंडळाचा आहे असे माझे ठाम मत होते. मला हातात पुस्तक घेऊन बसलेले उर्फ झोपलेले पाहुन आई काहिही न बोलता सरळ दिवा बंद करुन जायची आणि अचानक अंधार झाल्याने जाग येऊन मग मला Embarrassment की काय म्हणतात तसले व्हायचे. बाबा म्हणायचे की "अरे झोप येत असेल तर गणिते सोडवत बस." आता त्यांना कोण सांगणार की मला ती 'क' गट 'ड' गट वाली गणिते सुटली असती तर मी बोर्डात येण्याची आशा सोडली असती का? "अभ्यास करुन कोण शिपाई झालाय" अशी समजुत करुन घेऊन १२वी नंतर निमुटपणे दुकानात गल्ल्यावर बसण्याचेच मी नक्की केले होते. पण झाले मात्र वेगळेच.. छ्या...

Hostel ला राहायला गेल्यावर तर झोपेनं माझ्याकडे पाठच फिरवली. गावगप्पा मारुन झाल्या की मग रात्री ३,४ ला झोपुन सकाळी निवांतपणे ऊठायचे आणि जमले तर ३ऱ्या, ४थ्या Lecture ला जायचे असा खास प्लॅन आमचा रूम पार्टनर ६ चा अलार्म, घसा/नाक साफ़ करणे कार्यक्रम, बादलीचे वाद्यसंगित आणि नंतर पूजेच्या वेळी घंटेची टिणटिण ईत्यादी प्रकार करुन ऊधळुन लावायचा. एक वेळ रात्री बरोब्बर माझ्याच कानाशी गुणगुण करणारे डास परवडले पण याच्या घंटेची टिणटिण नको असे व्हायचे कधिकधि पण तो नंतर Canteen ला गेलो की रोज आम्हाला चहा, पोहे, बटाटावडा खायला घालायचा त्यामुळे आम्हाला दया येऊन आम्ही त्याच्या त्या 'झोपमोडु' चाळ्यांकडे दुर्लक्ष करायचो.

मी काही दिवसांपुर्वी माझ्या कमी झोपेविषयी एका होवु घातलेल्या आणि लवकरच ज्याच्यामुळे कित्येक पेशंट्स चा जीव धोक्यात येणार आहे अशा माझ्या Doctor मित्राचा सल्ला घेण्याची चुक केली. मला नक्की काय होतंय हे पुर्ण न ऐकताच "साल्या, तुला ४ तास तरी झोप मिळतीय, मला साधी २ तास पण नाही मिळत या पेशंट्स मुळं" असे ऐकवुन माझ्या तोंडाला टाके घातले. नंतर "तु पण माझ्यासारखंच झोपेच्या गोळ्या घेणे चालु कर" असा एक जालिम उपायही सुचवलान त्यानं.. तो बोलता बोलता झोपल्यावर मी तिथुन तडक निघालो आणि पुन्हा कुठल्याही नव्या Doctor कडे पण गेलो नाही.
तसं पाहायला गेलं (शब्दश: नाही) तर इतरही काही दैनिक गोष्टी ठराविक वेळी माझ्याकडुन होत नाहीत, त्याकरीता बऱ्याच वेळा मला 'विशेष प्रयत्न' करावे लागतात. झोप ही पण आता त्यातलीच एक गोष्ट झालेली आहे. तात्पर्य हेच की "माझ्या झोपेची झोप सध्या पार उडालेली आहे..."

ठिक आहे तर मग मित्रांनो, मैत्रिणिंनो आता बास करतो हे 'झोप-पुराण'. सकाळचे १० वाजलेत आणि चक्क मला खुप झोप येतीय. तुम्हा सर्वांना यापुढेही उत्तम झोप मिळो, छान छान स्वप्ने पडोत हीच निद्रादेवतेच्या चरणी प्रार्थना. मलाही जरा झोप मिळो, कमी भयानक स्वप्ने पडोत, आणि लवकरच 'जवळजवळ' झोपण्याची संधी लाभो यासाठी तुम्हीही प्रार्थना करालच. Good Night... oops... Good Day...

(तेवढ्यात...)

टिंगटिडींग टि टिंगटिडींग टी टिंग टिंग टिंग ("मुझको निंद आ रही है सोने दो" च्या चालीवर) "Hello!!! yes sir... not really sir... Conference call at 12 ???... Ammmm... no problem sir...!!!"

घ्या... वाजले माझ्या झोपेचे १२ !!!

Thursday, May 10, 2007

कृष्ण जन्मला ग बाई...

माझे वेगळेपण अगदी माझ्या जन्मापासुनच कळुन येते. माझा जन्म गौरी विसर्जनाचा. रात्री १२ च्या सुमारास मी रडत रडतच या प्रुथ्वीवर पाऊल टाकले. (रात्र आणि माझी गट्टी ही तेव्हापासुनच.) मी आमच्या मिरजेच्या घरात एका अंधाऱ्या खोलीतच पहिले ट्यँहाँ केले अर्थात जन्मलो. काही थोर व्यक्तींमधे आणि माझ्यात येवढेच काय ते साम्य. आईला हॉस्पिटलात नेण्याइतपतही मी बाकीच्यांना वेळ दिला नाही. एखाद्या ठिकाणी दिलेल्या वेळेआधी पोचण्याची सवय ही तेव्हापासुनची बर का. घाई घाई मरणाची (खरे तर जन्माची) घाई मला. विशेष म्हणजे माझ्या पणजीनेच जिला आम्ही आज्जीया म्हणायचो तिनेच त्यावेळी डॉक्टरीण बाईची भुमिका पार पाडली.

गणपतीतला जन्म, मोठे कान आणि इतर बाळलीला पाहुन मला गणपतीचे एखादे नाव ठेवावे असे माझ्या आज्जीने सुचवले. आईच्याही मनात "प्रणव" नाव ठेवावे असे होतेच पण पत्रिकेप्रमाणे नेमके "यो" अक्षर आले आणि सगळा घोळ झाला. आजोबा माझे नाव योगेश्वर ठेवा म्हणत होते पण आई-बाबांनी त्याला जाम विरोध करुन शंभरातल्या किमान पंचवीस मुलांचे जे नाव असते तेच नाव माझेही ठेवले.. "योगेश" !!!

दुधाची तहान ताकावर या म्हणीप्रमाणे मला गणपतीचे नाही तर नाही किमान कृष्णाचे तरी असावे म्हणुन "योगेश" असे नाव ठेवण्यात आले...